http://sumbaran.com/article/ हम-ख़वातीन:-शतकापूर्वीच्या-मुस् लिम-स्त्रियांचा-आवाज
हे लेख या स्त्रियांनी आपल्या दैनंदिन जगण्याच्या अनुभवातून लिहिलेले आहेत, ते अनुभव, ते जगणं त्यांना विचार करायला, प्रश्न विचारायला भाग पाडतंय आणि तेच या लेखांमध्ये उमटताना दिसतं. रोजच्या जगण्यातून आलेलं असलं तरी ते राजकीय – सामाजिक भूमिका घेणारं आहे, त्यात केवळ अनुभव नाहीत तर त्याचं सामाजिक आणि राजकीय विश्लेषणही आहे.
हे लेख या स्त्रियांनी आपल्या दैनंदिन जगण्याच्या अनुभवातून लिहिलेले आहेत, ते अनुभव, ते जगणं त्यांना विचार करायला, प्रश्न विचारायला भाग पाडतंय आणि तेच या लेखांमध्ये उमटताना दिसतं. रोजच्या जगण्यातून आलेलं असलं तरी ते राजकीय – सामाजिक भूमिका घेणारं आहे, त्यात केवळ अनुभव नाहीत तर त्याचं सामाजिक आणि राजकीय विश्लेषणही आहे.
'हम ख़वातीन' म्हणजे 'आम्ही स्त्रिया'. साधारण शंभर वर्षापूर्वी मुस्लिम स्त्रिया काय विचार करत होत्या, कशा व्यक्त होत होत्या, कोणते विषय त्यांच्या जिव्हाळ्याचे होते याचा सुंदर आलेख 'हम ख़वातीन' हे सादरीकरण आपल्यासमोर उभं करतं. मुस्लिम स्त्रियांबद्दलच्या आपल्या साचेबंद विचारांना आवाहन देतं. त्याचबरोबर, त्यांचं जगणं, त्यांचे विचार, त्यांची सामाजिक दृष्टी याची एक झलकही आपल्याला देतं. १९व्या शतकाचा उत्तरार्ध आणि २० व्या शतकाचा पूर्वार्ध हा असा कालखंड होता ज्या काळात आपल्याला समाजातल्या विविध स्तरातल्या स्त्रियांमध्ये अात्मभानाची जाणीव तयार होताना दिसते. त्यांचं कार्य, लिखाण, भाषणं यातून ते घडताना दिसतं. हे लिखाण स्त्री शिक्षण, स्त्रियांचे हक्क, लिंगभावभेदातून अनुभवाला येणारं शोषण, जात वास्तव, परंपरा आणि आधुनिकता अशा अनेक मुद्द्यांना हात घालतं. त्यामुळे, स्वातंत्र्यपूर्व काळात घडणाऱ्या सामाजिक-राजकीय बदलांच्या पार्श्वभूमीवर हे लिखाण समजून घेणं जितकं महत्त्वाचं ठरतं तितकंच आजच्या संदर्भात त्याचं आकलन करणं हेही अत्यावश्यक ठरतं.
'कलाम-ए-निस्वॉं'चं मुखपृष्ठ. सौजन्य-निरंतर
या काळातल्या काही लेखांचा संग्रह पूर्वा भारद्वाज यांनी संपादित केलेल्या 'कलामे निस्वॉं' च्या रूपाने २०१३ साली प्रकाशित करण्यात आला आणि या लेख संग्रहावर आधारित 'हम ख़वातीन' हे अभिवाचन दिल्लीच्या 'रसचक्र' या संस्थेनं पुण्या-मुंबईत अलिकडेच सादर केलं. पाटण्याच्या विनोद कुमार यांनी ते दिग्दर्शित केलं असून त्यात १९११ ते १९२७ या दोन दशकात लिहिलेल्या निवडक लेखांचा समावेश केला आहे. तहजीबे निस्वॉं (१८९८), इस्मत (१९०८), शरीफ बीबी (१९१०), आगरा के परदानशीन (१९०६), खातून (१९०४) या सारख्या स्त्री-केंद्रित नियतकालिकात या मुस्लिम महिलांनी लिखाण सुरू केलं. या लेखिका लाहोर, दिल्ली, अलिगढ, लखनौ अशा वेगवेगळ्या पण त्याकाळी राजकीय दृष्ट्या सक्रिय असलेल्या या शहरातल्या होत्या. यात मुलींच्या शिक्षणापासून ते साथीदार निवडण्याचं स्वातंत्र्य असण्याचा हक्क, मुलींनी घालायच्या दागिन्यांचा अर्थकारण आणि समाजकारणाशी असलेला संबंध, तसंच शासन, त्यावर टीका करण्याचं स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य या सारख्या अनेक पैलूंना या लेखिका हाताळताना दिसतात. अर्थात त्याकाळच्या सामाजिक बंधनांमुळे यातल्या काही स्त्रियांनी अनामिक लेखन केलं तर काहींनी अमुकची बहीण किंवा तमुकची मुलगी अशा नावांनीही लिखाण केलंय. पण यामुळे त्यांच्या लिखाणाला आणि विचारांना मर्यादा आलेल्या दिसत नाहीत. त्यांच्या लिखाणातला स्पष्टपणा, सडेतोड भाष्य, तसंच त्यातली उपरोधिक आणि खुमासदार भाषा भावून जाते, सादरीकरण अधिक खुलवते. अर्थात २०व्या शतकाच्या पूर्वार्धातली भाषा आणि तीही उर्दू असल्यामुळे काही गोष्टी समजायला जरा अवघडही जात होत्या. पण ती आमच्यासारख्यांची भाषिक मर्यादा! पण त्यामुळेच, कदाचित काही शब्दांचं सुलभीकरण केलं तर समजायला सोपं जाईल आणि अधिकाधिक लोकांपर्यंत सहजपणे पोहोचता येईल असंही वाटलं.
छायाचित्र सौजन्य: रसचक्र, दिल्ली.
एक महत्वाची गोष्ट हे एेकताना / पाहाताना लक्षात आली की हे लेख या स्त्रियांनी आपल्या दैनंदिन जगण्याच्या अनुभवातून लिहिलेले आहेत, ते अनुभव, ते जगणं त्यांना विचार करायला, प्रश्न विचारायला भाग पाडतंय आणि तेच या लेखांमध्ये उमटताना दिसतं. रोजच्या जगण्यातून आलेलं असलं तरी ते राजकीय – सामाजिक भूमिका घेणारं आहे, त्यात केवळ अनुभव नाहीत तर त्याचं सामाजिक आणि राजकीय विश्लेषणही आहे. अौपचारिक शिक्षणाबरोबरच स्त्रियांच्या वैचारिक व बौद्धिक कक्षा रूंदावण्यासाठी ही नियतकालिके किती महत्वाची भूमिका बजावतात, हे सुरूवातीच्याच लेखातून तर समोर येतं आणि ते किती तंतोतंत खरं आहे याचं प्रत्यंतरही पुढच्या लेखांमधून येतं. स्त्री शिक्षणाच्या चळवळीला या काळात जोर धरू लागला होता त्यामुळे मोठ्या प्रमाणात मुस्लिम मुलीही शाळेत जाऊ लागल्या होत्या. या शाळेत जाणाऱ्या मुलींकडे मात्र समाज आणि कुटुंबातले लोकही विचित्र नजरेने बघत, त्यांच्या शिक्षण घेण्याच्या ध्येयाविषयीच शंका घेत, त्यांना सतत टीकेला तोंड द्यावे लागत असे याचं वर्णन एका लेखात येतं. तर 'फट पडे वो सोना जिसे टूटे कान' या लेखात स्त्री-पण आणि त्याचा दागिन्यांशी लावलेला संबंध त्यामुळे घराबाहेर पडताना, दागिने सामाजिक समारंभात एखादी स्त्री कानात मोठे डूल न घालता गेली तरी तिला टोमणे कसे एेकावे लागत किंवा स्त्रियांनी भरपूर दागिन्यानी मढलेलं असावं यासाठी असलेला दबाव या विषयीही त्या लिहितात. संत मीरेविषयीचा लेख तिचा इतिहास तर सांगतोच पण तिच्या बंडखोरी विषयीही भाष्य करतो, तसंच बालविवाह, गडगंज संपत्तीपेक्षा शिकलेला, समजूतदार नवरा असावा आणि तो निवडण्याचं स्वातंत्र्य मुलींना असावं हे सांगणारे ही लेख या काळात लिहिले गेले.
यातला १९२७ चा खादीवरचा लेख हेही असंच एक उदाहरण. एका स्त्रीला जो अनुभव येतो तो ती मांडते आणि त्यातून एकूणच खादीच्या लोकप्रियतेबद्दल प्रश्न विचारते. खादीचं कापड चार धुण्यात खराब होतं, रंग उतरतो, फाटलं तर रफूही करता येत नाही, डाग पडला तर तो पसरत जातो आणि निघता निघत नाही आणि त्या काळातल्या खादीच्या लोकप्रियतेमुळे ते कापड जास्त पैसे मोजून विकत घ्यावं लागतं ही तर टीका ती लेखिका करतेच पण तेवढ्यावरच न थांबता पुढे जाऊन विणकर समाजाला खादीच्या चळवळीत सामावून का घेतलं गेलं नाही असा मार्मिक प्रश्नही विचारते. १९१९ च्या जाचक रौलेट अॅक्टच्या पार्श्वभूमीवर लिहिलेल्या 'सरकार हव्वा नही है' या लेखात नागरिकांचे चार प्रकार मांडले गेलेत: पहिला सरकारची कायम स्तुती करणारा, दुसरा सरकारवर फक्त टीकाच करणारा, तिसरा सरकारच्या धोरणांबद्दल मनात कुढणारा पण प्रत्यक्ष काही न बोलणारा आणि चौथा केवळ विश्लेषण करणारा पण प्रत्यक्ष कृती न करणारा बुद्धिजीवी वर्ग. पुढं जाऊन त्या असंही मांडतात की लोकशाही रूजण्यासाठी सरकारवर टीका करणं आवश्यक आहे आणि त्याकरिता लोकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य असलं पाहिजे त्याचबरोबर 'सरकार' या गोष्टीला अस्पृश्य न मानता शिकलेल्या महिलांनी मोठ्या प्रमाणावर त्यात सहभागीही झालं पाहिजे. युरोपचं उदाहरण देऊन अभिव्यक्ती स्वातंत्र्य असलेले देश कसे वेगानी प्रगती करतात याचा दाखलाही इथं त्या देतात.
अर्थातच, १९व्या आणि २० व्या शतकात स्त्रियांनी केलेल्या बरंचसं लिखाण हे प्रस्थापित व्यवस्थेला प्रश्न विचारणाऱ्या त्यांच्या बंडखोरपणामुळे यातले अनेक संदर्भ, लिखाण हे कालाच्या अोघात दडपले गेले. यातलं बरंचसं लिखाण गेल्या काही दशकात पुन्हा सार्वजनिक पटलावर (पब्लिक डोमेन) आणलं जातंय, त्यावर चर्चाविश्व घडताना दिसतंय. अलिकडच्या काळात अभिवाचनाच्या माध्यमातून असे लेख कलात्मक रितीने लोकांसमोर आणणं, त्यावर विचार व चर्चा होणं आणि सांस्कृतिक क्षेत्रातील या हस्तक्षेपातून अनेक सामाजिक प्रश्नांबद्दल उहापोह करणं हेही आपल्याकडे रूजू लागलंय. या कार्यक्रमाच्या आयोजक रजिया पटेल म्हणतात की आज मुस्लिम स्त्री म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर फक्त फतवे, तलाक, बुरखा याच गोष्टी येतात पण मुस्लिम स्त्रिच्या या प्रतिमेला या अभिवाचनातून नक्कीच आवाहन दिलं जातं. विनोद कुमार यांनी कार्यक्रमात सांगितल्याप्रमाणे इस्मत चुघताई यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त त्यांना आदरांजली वाहाणं हाही उद्देश 'हम ख़वातीन' या कार्यक्रमाचा आहे. यातून असं घडलं की प्रस्थापित व्यवस्थेला हादरवून टाकणाऱ्या इस्मत चुघताई सारख्या बंडखोर लेखिकेसाठी जणू या सगळ्या लेखिकांनी पार्शभूमी तयार करून ठेवली होती त्यामुळे इस्मतच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त या स्त्रियांचे आवाज आपल्यापर्यंत पोहोचवणं हे असे आवाज बुलंद करण्याच्या दिशेने उचललेलं एक पाऊल आहे.
Comments
Post a Comment